Sunday 24 December 2023

लवकर विवाह "न" जमण्याची काहीं कारणे..!



लवकर विवाह "न" जमण्याची काहीं कारणे..! 

चालू वर्षी गुरूबल नाही, चंद्रबल नाही. त्यामुळे योग नाही. असं असणाऱ्यांची संख्या अल्प असते. पण पूर्ण दैवावरच हवाला ठेवून हतबल राहाणाऱ्यांची संख्याही बरीच असते. संधी ही अनेकदा येत असते. म्हणजे योग अनेकदा येत असतो. नशिब ५०% असतं. परंतु आपले प्रयत्नही ५०% असायलाच हवे असतात.

(उदा. जेवणाचे ताट समोर आले आहे. 
पण आपण हातच हालवला नाही तर...?)

अनेकांच्या बाबतीत हेच घडतंय. पाचेक वर्षातील अनुभवांती जे दिसलंय ते स्पष्टपणे लिहिलय..!

▶ एखादे स्थळ चालून आले आहे. 
त्वरित प्रतिसाद न देणे.

▶ स्थळ पाहून झाल्यावर स्वतः काही न कळवता दुसऱ्याच्या उत्तराची वाट पाहाणे.

▶ होकार / नकार कळविण्यात टाळाटाळ किंवा विलंब करणे.

▶ फोन आला असता- "मग सांगतो, विचारून सांगतो" असे म्हणून घोंगडे भिजत ठेवणे. म्हणजेच त्या स्थळाला दुसरीकडे जायला वाट मोकळी करून देणे.

▶ वधू-वर केंद्राकडून कित्तीही बायोडाटे आले तरी आणखी काही नविन येताहेत कां? याची वाट पहात राहणे.

▶ सगळं सगळं जुळत असतानाही ह्याही पेक्षा आणखी कुठं असेल कां? हा शोध चालूच ठेवणे.

▶ शुल्लक बाबीचा दोष काढणे. रंग' उंची, पगारातील तफावत, शेती नाही. (असली किंवा घेतली तर कसणार कोण ?) पुणे, मुंबईत फ्लॅट नाही. (आपण पुण्यात आलो तेंव्हा होता कां?) जमवण्या पेक्षा फिस्कटवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे.

▶ मेकअप थापलेले व खास तयार करून घेतलेले फोटो पाठवून स्थळांची फसवणूक करणे. (जसं आहोत तसा फोटो असावा. व्यक्तीमत्व महत्वाचे असते. प्रसन्न चेहरा व बोलण्यातील गोडवा हाच आपला ठसा उमटवण्याची साधने आहेत)

▶ अनेक वेळा अनेक फोटो मागवणे. प्रत्यक्ष मुलगा / मुलगी न पाहाता फोटोवरून रंग, चेहरा, बांधा, स्वभाव ह्याचा (खोटा) अंदाज बांधणे.

▶ प्रत्यक्ष भेट देवून पाहणे, समक्ष मुलगा/ मुलगी त्यांचे कुटुंबिय ह्यांच्याशी भरपूर बोलणे. वय, शिक्षण, नोकरीचे ठिकाण इ. बाबीकडे जातीने लक्ष न देता, भलत्यानांच फोन करुन गुप्तहेर असल्यासारखे माहित्या काढणे, पण स्वतः घर सोडणे नाही.

▶ "रजा नाही." "वेळ नाही". अशी लांबड लावून हातचे स्थळ घालवणे. (जणू कंपनी बंद पडतेय.) पाहूण्यांपैंच्या लग्नाला मात्र हजर. (तिथं अंदाजपंचे शोध सुरू ठेवणे.)

▶ मुलां / मुलींनी काही कारणे पुढे करून, टाळाटाळ करणे व पालकांनी आपला संसार विषयक अनुभव गुंडाळून ठेवून त्यांचेच समर्थन करणे.

▶ आपण स्वतःला आरशात न पहाता इतरांचे माप काढणे.

▶ टीव्ही, चॅनेल वरील हिरो, हिरॉईन प्रमाणे संसाराचा साथीदार असावा. अशी भ्रामक कल्पना बाळगणे.

▶ पालकांनी बऱ्याच वेळा फोन बंद ठेवणं, लवकर फोन न उचलणं, स्वतः पुन्हा फोन न लावणं.

▶ पालकांनी वधू-वर केंद्राकडे स्वतःचा किंवा घरातील व्यक्तीचा व्हॉटअॅप नंबर न देणं. (त्यामुळे माहिती, याद्या, फोटो बाहेरगावी -मुलां, मुलींकडेच जातात. ह्यातील सगळं घरच्यां पर्यंत पोहोचतच असं नाही.).

▶ स्थळाची पसंती करणारे प्रमुख घटक म्हणजे - दोन्ही कडील आई, वडील, मुलगा व मुलगी आणि कुटुंबातील काही घटक. ह्यानी सर्व चौकशी करुन विवाह निश्चिती करण्या ऐवजी अनेकांना वेळोवेळी बघण्यासाठी पाठवणे. आणि त्या बघ्या मंडळीवर अधिक विश्वास ठेवणे.

▶ मुलगी पाहाणे ह्या कार्यक्रमाचे वेळी मुलगा व मुलीस आपसात संवाद साधणेसाठी किमान दहा मिनीटे तरी वेळ देण्यास टाळाटाळ करणे. ('जे आयुष्यात पहिल्यांदाच भेटताहेत व पुढं उभं आयुष्य काढायचंय त्यांचेसाठी मतं मांडायला संधी हवीय हो!').

▶ कुटुंबात ऐनवेळी मतभिन्नता उफाळून येणे.
▶ मुला/मुलींचं वय अधिक वाढलं तरी सुद्धा बिनधास्तपणे, असतात, मिळतात अशी सुद्धा स्थळं ? असं म्हणत राहाणं. (विवाहात वयाला महत्व असते. बाकी सर्व गौण असते याचे भान विसरणे!).

▶ मुलां / मुलींनी एका वेगळ्याच विश्वात रममाण होऊन राहणं / करिअरच्या नादात विवाह लांबणीवर टाकणं . (वय वाढतं, सौंदर्य घसरू लागते. तब्बेत पसरू लागते किंवा घटू लागते. केस, नजर साथ सोडू लागतात. कदाचित संतती प्राप्ती बाबत काहींना समस्याही निर्माण होण्याची शक्यता असते असं म्हटलं जातं. म्हणून वय वाढल्यावर काहीही पत्करण्या पेक्षा योग्य वेळेत निर्णय घ्यावा.).

▶ कुटुंबातील व्यक्तीनी आपलं पद, प्रतिष्ठा, पैसा ह्यांची तुलना येणाऱ्या स्थळांबरोबर करणं. (प्रत्येकाचं नशिब वेगळं असतं.)

▶ पत्रिका पाहाताना खूप म्हणजे खूपच खोलात शिरणे. (यासाठी वरील ऑडिओ पूर्णपणे ऐकवा?) चांगलं भरपूर असलं तरी, थोडं दोषाचं दिसताच (इतर ठिकाणी पत्रिका न तपासता... पटकन नकार देणं. 
(आता सगळ्यानां सगळे ग्रह विशेषतः मंगळ कळायला लागलाय. पालकांच्या लग्नावेळी असं होत कां? जन्म तारखा खऱ्या होत्याकां? शाळेत घातलेली तारखेपासून ५ किंवा ६ वर्षापूर्वी चा दिवस हा जनमतारिख असायची) 

▶ सगळं पक्क झालं तरी बैठकीत कार्यालय कुठे? कसे आहे? जेवणात पदार्थ, बेत कसा आहे?
 (त्रयस्तांनी गोंधळ केला की पालकांनी मूग गिळून गप्प बसणे !

▶ मुलीच्या पालकानीच अधिक भार उचलावा म्हणून अडून बसणे. 
(जणू मुलगी देवून ते फार मोठी चूक करत आहेत?) 
(ह्या वेळी मुलगा आणि मुलगी ह्यानी केलेल्या पसंतीचा, भावनेचा विचार केला जात नाही.)

▶ (क्वचित जर न जाणो) बाहेर कुठं कुणाच जमलं असेल तर.. 
(पालकांना अंधारात ठेवून) येणाऱ्या प्रत्येक स्थळांना नकार देणे. 
(वास्तविक पालकांशी बोलून यातूनही योग्यतो मार्ग काढायला हवा आणि तो काढता येतो यावर विश्वास नसणे!).

▶ विवाह ठरत आला असतानाच कुठून तरी काहींतरी विपरित किंवा अफवा कळताच त्या बाजूच्या माणसांना भेटून खरं खोटं शहानिशा न करताच पटकन नकार देणे.

▶ (कुठल्याही) वधू-वर सूचक केंद्राकडे नाव न नोंदविणे. (एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक स्थळे उपलब्ध होत असताना थोडी तरी असलेली देणगी फी भरण्याची इच्छा नसते. मात्र अंदाजपंचे फिरण्यात व लग्नकार्यात मोकाट कितीतरी खर्च होत असतो तो हिशोबात नसतो.)

▶ वधू-वर, पालक मेळाव्यांना उपस्थित न राहणे (मुला मुली ऐवजी स्वतःच हजेरी लावणे. 
(प्रत्येक वधुवर सूचक केंद्रा कडून स्थळांची यादी, फोटो उपलब्ध होतातच. त्या शिवाय उपस्थितांकडून त्यांच्या नातेवाईकांतील स्थळे माहित होत असतात. वधू-वरांना समक्ष पाहाता आल्यामुळे अनेक गावे फिरण्याचा वेळ, खर्च वाचतो. संचलकांकडून खूप मौलिक माहिती, उदाहरणे वअनुभव ऐकायला मिळतात. पुढची वाटचाल सोपी होते.)

▶ ह्यापैकी काही किंवा इतरही काही कारणे अशी असू शकतात. (गेल्या पाचेक वर्षातील इच्छापूर्तीच्या स्वअनुभवावरून इथे सांगण्याचा प्रयत्न केलाय!)

▶ योग्य वाटल्यास किंवा योग्य असेल ते घ्यावे. आवडले तर पुढे पाठवावे, कारण बदल घडवायचा असेल तर एक व्यक्ती किंवा एखादी संस्था काही नाही करू शकत, तुमच्या मदती शिवाय... नाही का?

▶ आयुष्यात कार्य सफल व्हायच असेल? पुढं जायचं असेल? 
तर... तडजोड ही करणे आवश्यक च असते!

No comments:

Post a Comment

  महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चाललांय पण आमची मुलगी  काहीच करणार नाही. जे काही करायचं ते मुलगाच करेल.  स्वत:चं घर हे मुलगाच घेणार, कार ह...